क्राईम ब्लास्ट ब्यूरो
वर्तमानपत्रात रस्त्याची बातमी छापताना आपली प्रतिमा मलीन होईल असा मजकूर टाकून अब्रू नुकसान केल्याच्या संशयावरून शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश उदेसिंग पाडवी यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पाच पत्रकारांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीला संबंधित पत्रकारांनी आपल्या वर्तमानपत्रात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या अधिनस्थ 3054 नगर विकास अंतर्गत विशेष रस्ता योजना विषयांकित क्रमांक सहा मधील प्रभाग 13 मधील रस्ता तयार करण्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे माझी विद्यमान आमदार म्हणून जनमानसातील प्रतिमा मलिन होईल याचा विचार न करता व सत्यता पडताळणी न करता आपली मानहानी केली अशा आशयाची फिर्याद आमदार राजेश पाडवी यांनी पोलिसात दिली. त्यावरून पत्रकार अविनाश भामरे, रुपेश जाधव, रणजीत राजपूत, हर्षल सोनवणे आदिविरोधात भादंवि 499, 500, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार तपास करीत आहेत. अशा स्वरूपाचा हा अलीकडच्या काळातील पहिलाच गुन्हा असून त्याबाबत चर्चा सुरू आहे.