क्राइम ब्लास्ट ब्यूरो
जिल्ह्यात खळबळ माजवणार्या शिरपूरच्या राहुल भोई खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील प्राथमिक संशयित म्हणून गुन्हा दाखल झालेल्या एकाचे नाव वेगळे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच या खून प्रकरणात संशयित म्हणून दहिवदच्या एकाला अटक करण्यात आली आहे.
चार फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाला शिरपूर शहरातील क्रांतीनगर येथील भद्रा चौकात राहुल राजू भोई (वय 22) या युवकाचा खंजिराने वार करुन निघृण खून झाला होता. त्याच्या मृत्यूने संतप्त झालेल्या नागरिकांनी पाच फेब्रुवारीला शिरपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच शिंगावे येथील प्रमुख संशयित गणेश उर्फ भट्या सुभाष जगताप याच्या घरी जाऊन तोडफोडही केली होती. मृत राहुलचे वडील राजू भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत सात संशयित व त्यांच्या अन्य सहकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयितांपैकी बंटी नितिन पाटील (वय 22) याला पोलिसांनी अटक केली. प्रमुख संशयित गणेश जगतापही पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या फिर्यादीत कोहिनूर राजपूत नामक संशयिताचेही नाव होते. प्रत्यक्षात क्रांतीनगर भागातून पोलिसांनी कोहिनूर उर्फ समीर समद पिंजारी (वय 22) या युवकाला अटक केली आहे. त्यासोबतच दहिवद येथील स्मितनगरमध्ये राहणार्या हरिओम संजय सिंह (वय 19) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे कळते. समीर पिंजारी आणि हरिओत सिंह यांच्या अटकेमुळे या खून प्रकरणात नवा ट्विस्ट तयार झाला असून नेमके काय घडले ते पोलिस तपासातून समोर येण्याची वाट नागरिक पाहत आहेत.