क्राइम ब्लास्ट ब्यूरो
राज्याचे माजी कामगार मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह सहा जणांविरोधात सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरुन दोंडाइचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जमीन विक्रीचा करार करुन पैसे घेतल्यानंतरही दुसर्याला परस्पर विक्री केल्याचा संशय आहे. संशयितांमध्ये डॉ.देशमुख यांच्या भावाचाही समावेश आहे.
नंदुरबार येथील रहिवाशी शेख फारूक शेख नजीर यांनी दोंडाइचा पोलिस ठाण्यात दहा जानेवारीला याबाबतचा तक्रारी अर्ज दिला होता. त्याची चौकशी करुन पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिल्यानंतर 23 जानेवारीला हा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोंडाइचा शहरातील सर्व्हे नं.56/1 मधील 16 हजार स्क्वेअर मीटर जमीन मालक हेमंत भास्कर देशमुख, राजेंद्र विष्णू इंगळे, अंबादास कन्हय्यालाल मराठे, बापूसाहेब रवींद्र देशमुख यांनी 2022 मध्ये फारुख शेख यांना विकण्याचे कबूल करुन खरेदी खत तयार करुन देण्याची तयारी दर्शवली. त्यांचा विश्वास संपादन करुन फारुख शेख यांच्याकडून रोख 16 लाख रुपये व एक कोटी चार लाख रुपये बँक खात्याद्वारे घेतले. मात्र प्रत्यक्षात या जमिनीची विक्री त्यांनी दोंडाइचा येथील अनिल चंपालाल पारख व गणेश भुरमल बंब यांना केली. तसा व्यवहार करतांना राजेंद्र इंगळे हा संपूर्ण खरेदी खतातील संमतीदार आहे असे दर्शवले. एक कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली संशयित हेमंत देशमुख, राजेंद्र इंगळे, अंबादास मराठे, बापूसाहेब देशमुख, अनिल पारख व गणेशमल बंब यांच्याविरोधात दोंडाइचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.