एलसीबीची कारवाई
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तूल खरेदी करून परत जाणाऱ्या दोन युवकांना एलसीबी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली.

चोपडा शहरातील शिवाजी चौकात 13 नोव्हेंबरला रात्री अकराला सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. ह्युंदाई कार (एमएच 15, डीएम 7778) मधील युवकांना बाहेर काढून झडती घेतली असता त्यांच्याकडे चार गावठी पिस्तुले व दहा जिवंत काडतुसे सापडली. राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय ३२, मूळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर ह.मु.श्रीरामपूर जि. अहमदनगर) व गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय २३, रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) अशी संशयितांची नावे आहेत. राजेंद्र चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून अहमदनगर जिल्ह्यात त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी व रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश राऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.