क्राईम ब्लास्ट ब्यूरो
500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करून खपवण्यासाठी घेऊन गेलेल्या शिरपूरच्या तिघांसह शिंदखेडा येथील एकाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चोपडा शहरातील हॉटेल सुयोगजवळ ही कारवाई करण्यात आली. बनावट नोटा चलनात आणण्याचा संशयित प्रयत्न करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून छापा टाकला असता शिरपूरचे चार संशयित 500 रुपये दराच्या चलनी नोटा खपवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. संशयितांकडून 31 हजार रुपये (खऱ्या नोटा), 500 रुपयांच्या दोन बनावट नोटा, दोन मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संशयितांची चौकशी केली असता तीन जण शिरपूर तालुक्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. विजय सुरेश निकुंभ (वय 26, रा.खर्दे, किरण रमेश शिंदे (33, रा.सांगवी ता.शिरपूर सध्या रा.सिद्धार्थ नगर, शिरपूर), शंकर पुनमचंद वडर (रा.वाडी ता.शिरपूर) व संतोष वडर (रा.शिंदखेडा) यांचा संशयितांत समावेश आहे.