वीज कंपनीचे लाचखोर गजाआड

क्राईम ब्लास्ट ब्यूरो
वाईन शॉपला विद्युत पुरवठा करण्यासाठी दहा हजार रुपये घेतांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या लाइनमनला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन नोव्हेंबरला सायंकाळी रंगेहाथ पकडले. त्याने कनिष्ठ अभियंत्याच्या सांगण्यावरुन पैसे स्विकारल्याचा संशय असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एसीबीच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील तक्रारदाराचे शिरपूर तालुक्यातील खंबाळे गावात बिअर आणि वाईन शॉप आहे. तेथे कमर्शिअल पॉवर सप्लाय घ्यावयाचा होता. त्यामुळे त्यांनी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज केला. तालुक्यातील वीज कंपनीच्या सुळे येथील कक्षात जाऊन त्यांनी अभियंता समाधान सुधाकर पाटील याच्याकडे ऑनलाइन अर्जाची प्रतीसह अन्य कागदपत्रे दिली. त्या कामासाठी लाइनमन निलेश माळी याला भेटा असे पाटील याने सांगितले. निलेश माळी याने खंबाळे दुकानावर जाऊन तक्रारदाराची भेट घेतली. डिमांड नोट काढण्यासाठी त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. तसेच ही मागणी समाधान पाटील यांच्या सांगण्यावरुन केल्याचे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तीन नोव्हेंबरला विभागाच्या पथकाने सापळा रचून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना निलेश माळी याला रंगेहाथ पकडले. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, धुळे येथील उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंह चव्हाण, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.