क्राइम ब्लास्ट ब्यूरो

बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करणे टाळण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करणार्या दोन पोलिस अधिकार्यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
लाच मागितली गेल्याने व्यथित झालेल्या व्यक्तिने याबाबत तक्रार केली होती. त्यांच्या मुलावर जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कार व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 27 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तक्रारदार आपल्या मुलास भेटण्यासाठी गेले असता गुन्ह्याचे चौकशी अधिकारी पीएसआय समाधान गायकवाड याने त्यांना सांगितले की, तुमचा मुलगा अपहृत मुलीस घेऊन ज्यांच्या घरी थांबला होता, त्यात तुम्ही स्वत:, तुमची पत्नी, भाऊ व तुमची बहीण यांना आरोपी केले जाईल. ते टाळायचे असेल तर 60 हजार रुपये द्या. तडजोडीअंती ही रक्कम 15 हजार रुपये ठरली. पंचासमक्ष लाचेची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याने व त्यास सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी प्रोत्साहन दिल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर अधीक्षक एन.एस.न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक निरीक्षक दिनेशसिंह पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, ईश्वर धनगर, शिपाई राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली.