क्राईम ब्लास्ट ब्यूरो
तालुक्यातील नटवाडे आणि वरझडी येथील तिघांवर 33 लाख 53 हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला. ऊस तोड मजूर पुरवतो असे सांगून तिघांनी ही रक्कम उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बावची या गावचे रहिवासी भिमराव केरु पवार यांचा साखर कारखान्यांना ऊसतोड कामगार पुरवायचा व्यवसाय आहे. एप्रिल 2022 मध्ये मजूर टोळ्यांचा शोध घेत ते शिरपूर तुज्यात आले. त्यांना सुरसिंग दरेसिंग भिल, चंद्रकांत दरेसिंग भिल (दोघे रा.नटवाडे) व विजय छगन भिल (रा.वरझडी) भेटले. आपण ऊस तोड मजूर पुरवित असल्याचे त्यांनी सांगितले. पवार यांचा विश्वास संपादन करून त्यांनी मजुरांना ऍडव्हान्स द्यावा लागेल अशी मागणी केली. 13 एप्रिल ते तीन ऑक्टोबर या कालावधीत नटवाडे गावात, शिरपूरच्या सुदर्शन लॉजमध्ये, आरटीजीएस व फोन पे अशा विविध माध्यमातून त्यांनी वेळोवेळी एकूण 33 लाख 53 हजार रुपये घेतले. मात्र ठरलेल्या वायद्यानुसार मजूर पाठवले नाहीत किंवा पैसेही परत केले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भीमराव पवार यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड तपास करीत आहेत.