सोशल मिडीयावर आत्महत्येची पोस्ट टाकली…शेवटचा रामराम लिहून दोंडाईचा रेल्वे स्टेशनमध्ये 17 ऑक्टोबरला हिसार एक्सप्रेसच्या इंजिनाखाली उडी टाकून जीव देणार्या शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे तीन शिक्षक सहकारी आणि शाळेच्या शिपायाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहादा तालुक्यातील कवळीथ येथील आदर्श हायस्कूलमध्ये कार्यरत शिक्षक नंदलाल रामदास शिंपी (वय 56) यांनी दोंडाईचा रेल्वे स्थानकात आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मिडीयावर आत्महत्येच्या कारणाबाबत पोस्ट करुन व्हायरल केली होती. त्यावरुन त्यांच्या पत्नी सुनिता शिंपी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
संशयित आरोपींमध्ये आदर्श हायस्कूलचे शिक्षक एम.डी.पाटील, एम.बी.निकुंभ, जे.सी.जाधव व शिपाई एन.जे.सोनवणे यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत तपास करीत आहेत.
काय आहे कारण ? : नंदलाल शिंपी यांनी आपल्या पोस्टमध्ये संबंधित शिक्षक व शिपाई त्यांच्या कपाटातील शालेय दप्तराची अफरातफर करणे, कागदपत्रे इकडेतिकडे करणे, शालेय काम करीत असतांना अडथळे आणणे असा मानसिक त्रास देत असल्याचे नमूद केले आहे. संबंधितांचे मोबाईल नंबरही त्यांनी पोस्टमध्ये टाकले आहेत.