क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर महसूल विभागाच्या पुरवठा कार्यालयांतर्गत तब्बल 50 आस्थापनांना आयएसओ 9001 : 2015 मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी पुरवठा विभागासह चार आस्थापनांना हा बहुमान मिळाला होता. विक्रमी संख्येने आयएसओ मानांकन प्राप्त करणारा शिरपूर जिल्ह्यातील पहिलाच तालुका ठरला आहे.
तहसीलदार आबा महाजन यांच्या पुढाकारातून रास्त धान्य दुकानांचे स्वरुप बदलून ग्राहककेंद्री करण्यावर भर देण्याचे धोरण अवलंबण्यात आले. या बदलाची नोंद होऊन मूल्यमापन व प्रमाणीकरण व्हावे यादृष्टीने आयआरक्लास सिस्टम्स व सोल्यूशन्सच्या भारतीय नोंदणी व गुणवत्ता यंत्रणेतर्फे पडताळणी करुन घेण्यात आली. त्यात दुकानात उपलब्ध सुविधा, ग्राहकांना मिळणार्या सेवेचा दर्जा, स्वच्छता, धान्यसाठ्याची यंत्रणा, वितरण प्रणालीतील सुसूत्रता आणि ग्राहकांचे समाधान आदि बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यात पुरवठा कार्यालय, शासकीय धान्य गुदामासह दोन दुकाने तर दुसर्या टप्प्यात एकूण 50 दुकानांना आयएसओ 9001 : 2015 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.