क्राईम ब्लास्ट ब्यूरो
एकमेका साह्य करु, अवघे धरु भ्रष्टपंथ म्हणत अडल्यानडलेल्यांना खड्ड्यात घालत लाचखोरीचा धंदा करणारी सर्कल आणि तलाठ्याची भ्रष्ट जोडगोळी अँटी करप्शन ब्यूरोच्या कारवाईत रंगेहाथ पकडली गेली.

अमळनेर येथील तलाठी कार्यालयात दीड लाख रुपयांची लाच घेतांना जळगाव अँटी करप्शन ब्यूरोच्या पथकाने संशयित तलाठी गणेश राजाराम महाजन (वय 46 वर्ष, रा.नवीन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव) याला रंगेहाथ पकडले. त्याने मंडळ अधिकारी दिनेश शामराव सोनवणे (वय 48 वर्षे, रा.फरशी रोड, अमळनेर) याच्या वतीने लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणातील तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे तीन डंपर असून करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर (एमएच 18 एए 1153) अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे दोन महिन्यापूर्वी अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे संशयित सर्कल सोनवणे व तलाठी महाजन यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत जळगाव येथील अँटी करप्शन ब्यूरोकडे तक्रार देण्यात आली.
13 ऑक्टोबरला पथकाने तलाठी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. लाचेची रक्कम स्विकारताच तलाठी महाजन याला झडप घालून पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर अधीक्षक एन.एस.न्याहळदे, डीवायएसपी सतीश डी.भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शशिकांत एस.पाटील, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, बाळू मराठे, सुनिल वानखेडे, ईश्वर धनगर, महेश सोमवंशी, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, सचिन चाटे, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी यांनी ही कामगिरी बजावली.