क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी उमर्दा गणाच्या सदस्य श्रीमती लताबाई वसंत पावरा यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापतीपदी थाळनेर गणाचे सदस्य विजय संतोष बागुल यांचे बिनविरोध निवड झाली.
शिरपूर पंचायत समितीचे मावळते सभापती सत्तारसिंह पावरा व उपसभापती धनश्री बोरसे यांच्या पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शिरपूर पंचायत समितीच्या सदस्यांची विशेष सभा 13 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली. तहसीलदार आबा महाजन पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. सहाय्यक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी पी.एम.सोनवणे होते.
सकाळी सर्व सदस्य जनक व्हिला येथे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर आमदार अमरीशभाईंनी दिलेल्या निर्देशानुसार सर्वजण पंचायत समितीमध्ये पोहोचले. सभापती पदासाठी लताबाई वसंत पावरा तर उपसभापती पदासाठी विजय संतोष बागुल यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. विहित मुदतीत इतर कोणत्याही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सभापतीपदी लताबाई पावरा तर उपसभापती पदी विजय बागुल यांचे बिनविरोध निवड झाल्याची घोषणा तहसीलदार आबा महाजन यांनी केली.
निवडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर स्वीय सहाय्यक अशोक कलाल यांच्यासह विविध पदाधिकारी, मावळते सभापती व उपसभापती आणि सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. पंचायत समितीच्या आवारात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
लताबाई पावरा या माजी जि.प.सभापती वसंत मांगू पावरा यांच्या पत्नी असून उमरदा गणातून निवडून गेल्या आहेत. त्यांचा मुलगा भिकेश पावरा हा देखील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दुरबळ्या गावाचा सरपंच म्हणून बहुमताने निवडून गेला आहे. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे ग्रामीण भागातून स्वागत करण्यात आले.