क्राईम ब्लास्ट ब्यूरो
आतापर्यंत लम्पी स्कीन आजारापासून सुरक्षित राहण्यात यश मिळवलेल्या शिरपूर तालुक्यातही लम्पी स्कीन आजाराने शिरकाव केला असून या पार्श्वभूमीवर गुरांची खरेदी विक्री करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे.
शिरपूर तालुक्यातील निमझरी, बोरगाव शिंगावे, थाळनेर, ताजपुरी, दोंदवाडे, वाघाडी, भटाणे व दहिवद येथे जनावरांना लम्पीची लागण झाल्याचा अहवाल पुणे येथील पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे या बाधित गावांचे क्षेत्र व रोगप्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरचा परीघ सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे अशा सूचना देऊन तेथील पशुधनाची खरेदी विक्री आणि वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. शिरपूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यात नव्याने 16 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव झाल्याचे कळते.