क्राईम ब्लास्ट ब्यूरो
दसऱ्यानिमित्त मुंबई येथे बीकेसी मैदानावर आज (दि.5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा होत आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी शिरपूर शहर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाने तालुक्यात इतक्या खोलवर शिरकाव कधी केला याच्या विचाराने अन्य राजकीय पक्ष बुचकळ्यात पडले असून आगामी काळात राजकारणातील उलथापालथ वाढण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

शिरपूर तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भरलेल्या तब्बल 14 बसेस मुंबईकडे रवाना झाल्याचे कळते. प्रत्येकी 40 कार्यकर्ते जमेस धरले तरी शिरपूरचे सुमारे साडेपाचशे कार्यकर्ते बीकेसी मैदानावर हजर राहतील हे स्पष्ट आहे. शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर जाहीररीत्या अद्याप कोणीही शक्तिप्रदर्शन केलेले नाही. मात्र शिंदे गटात गेलेल्या शिरपूरच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरुन चांगलेच बळ पुरवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम प्रथमच दसरा मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना होण्यात झाल्याचे स्पष्ट आहे.
साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, संजय गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात शिंदे गटात कार्यरत दीपक जमादार, मनोज धनगर, संजय पाटील, कन्हैया चौधरी, बंटी लांडगे, डॉ. गणेश वाडीले, भैय्या कोळी, सुनील पावरा, मनोज साळुंखे, मनसाराम पावरा, भागीरथ पावरा, तुषार महाले, राजेंद्र शिंपी, विकास महिरराव, नंदू महाराज, जितू राजपूत, जितु कलाल, हर्षल चौधरी, मिलिंद धनगर आदींनी मुंबई दौऱ्याचे संयोजन केले आहे.