विकासाचा चेहरामोहरा
भल्याभल्यांची बत्ती गुल कशी करावी आणि आपली पॉवर कशी दाखवावी याचे ज्ञान आणि तंत्रज्ञान अमरिशभाईंकडे विपुल प्रमाणात आहे. एरवी कमालीचे शांत, सुशील असलेले अमरीशभाई राजकारणाचा विषय आला की दक्ष होतात आणि आक्रमकतेने व्यूहरचना करतात. अनेकांनी निवडणूक काळात त्यांच्या या गुणांचा अनुभव घेतला आहे.
राजकारणात अमरीशभाई इतके मुरब्बी आहेत यामागे त्यांची कित्येक वर्षांची तपश्चर्या आहे. रूढ अर्थाने राजकारणाशी कधीही कसलाच संबंध नसलेल्या कुटुंबाचे अमरीशभाई घटक ! वडील रसिकलालजी व्यावसायिक आणि समाजसेवेत रमलेले व्यक्तिमत्त्व ! अशा पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करतांना भाईंकडे एकच भांडवल होते, ते होते माणसांची अचूक पारख करण्याचे….त्याच्या बळावर भाईंनी एकेक माणूस निवडला आणि कायमस्वरूपी जोडला..काही कच्चे भिडू होते, ते निसटले आणि आज त्यांची नावेही कोणाला आठवत नाही. परिसाचा स्पर्श लाभण्याची संधी लाभत असतांना काहींना भंगारात राहणेच अधिक आवडले. भंगार झाले, कुजून गेले आणि शेवटी मातीमोल ठरले ! असो..
आमदार पदाची कारकीर्द सुरू करतांनाच भाईंनी आपल्या धोरणीपणाची चुणूक दाखवली. तालुक्यातील तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेत त्यांनी स्वतःला लोक प्रतिनिधी पदाचे सर्वाधिक पात्र उमेदवार म्हणून स्थान निश्चित केले. त्यापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत तापी पाणीपुरवठा योजना, व्यापारी संकुल उभारणी, सुसज्ज उद्याने आदींच्या माध्यमातून त्यांनी आपल्या विकासाभिमुख दृष्टीकोनाची प्रचिती आणून दिली होती. तालुक्यात त्यांच्या नावाची द्वाही फिरली आणि प्रचंड बहुमताने भाई आमदार झाले. इतिहास घडला. स्वतःच्या नाट्यगोत्यातले एकही घर नसलेला माणूस आमदार झाला !
तेव्हापासून आजपर्यंत विकासाच्या बळावर भाईंची वाटचाल सुरू आहे. या प्रवासात त्यांना अडविण्याचे प्रयत्न झाले. प्रचंड दूरदृष्टी असलेला हा नेता खान्देशचे नेतेपद अलगद खिशात टाकेल या भीतीने वेगवेगळे गट तयार करून भाईंच्या विजयाचा वारू रोखण्याची मसलत रचली गेली. पण त्यावरही लीलया मात करीत भाईंनी जिल्हाभरात आपले स्वतंत्र अस्तित्व तयार केले. त्यांच्या विकासाला प्रमाण मानून आपण विकास करू असा अजेंडा राबवणारे समर्थक निर्माण झाले. भाईंना अडवणारे आज इतिहासजमा झालेत. पण भाई मात्र ध्रुव ताऱ्याप्रमाणे अभंग आणि निश्चल आहेत. ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक, विधानसभा आणि लोकसभा अशा एक ना अनेक संस्थांमध्ये भाई म्हणजेच विजय हे समीकरण बनले आहे. भाईंनी व्यूह रचला म्हणजे विषय संपला असे हमखास घडते.
1985 ते 2022 या कालखंडात राजकारणात किती पिढ्या आल्या आणि गेल्या, सर्वांच्या नेतृत्वस्थानी मात्र अमरीशभाई कायम राहिले आणि आहेत. काळाची गरज ओळखून नव्याना संधी देणे हे भाईंना जितकं जमलं तितक कोणालाच जमलेलं नाही. म्हणून सत्तरीतला वृद्ध ते विशीतला नवयुवक या सर्वांचे एकमान्य, लोकमान्य नेतृत्व बनणे भाईंना शक्य झाले. आपल्या स्वगुणांनी हा अचाट प्रवास साध्य करणारे पॉवरफुल नेते अमरीशभाई पटेल औक्षवंत होवोत, जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना !
–संदीप जमादार
मुख्य संपादक
क्राईम ब्लास्ट