क्राईम ब्लास्ट ब्यूरो
दहा सप्टेंबरला शिरपूर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची जनरल मिटींग आहे. कारखाना भाडेतत्वावर द्यावा असा ठराव सभासदांच्या संमतीने मंजूर करुन घेण्यासाठी ही सभा बोलावली आहे. मात्र त्यापूर्वीच मिटींगबाबत चर्चा करण्यासाठी शेतकरी संघर्ष समिती व शेतकरी विकास फाऊंडेशनने वेगळी बैठक घेतली. त्या बैठकीत उपस्थित नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन चर्चा सुरु झाली आहे.

डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी जनरल मिटींग घेण्याचा निर्णय म्हणजे सभासद, आंदोलनकर्ते व शेतकर्यांचे यश असल्याचे सांगून सभेचे व्हिडीओ शूटींग करण्याची मागणी केली. सभेला सर्व सभासदांनी हजर राहून ठरावाला पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. अॅड.गोपालसिंह राजपूत यांनी ठराव केल्यानंतर कारखाना तातडीने सुरु करण्यात यावा अशी मागणी केली. मानव एकता पार्टीचे युवा नेते कल्पेशसिंह राजपूत यांनी शिसाका सुरु करण्यासाठी संचालकांना संपूर्ण सहकार्य करु, गाळप हंगाम सुरु होईपर्यंत लढा सुरुच ठेवू अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे नेते दिनेश मोरे शिसाका भाडेतत्वावर देण्यासाठी उचललेल्या पावलांचे स्वागत करुन सहकार्याची हमी दिली. मोहन पाटील यांनी जनरल मिटींग तात्पुरत्या राजकीय फायद्याची न होता खरोखर शिसाका सुरु करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने पार पडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
ती मागणी कुठे गेली ?
दरम्यान कारखान्याच्या काही सभासदांमधून 10 सप्टेंबरच्या जनरल मिटींगमध्ये शिसाका मल्टीस्टेट सहकारी कायद्यातून बाहेर काढून राज्य शासनाच्या अखत्यारित आणण्यासाठी ठराव करावा अशी मागणी केली जात आहे. त्या मागणीचे काय झाले, ती पुढे सरकेल किंवा नाही याविषयी चर्चा सुरु आहे. बैठकीत शिरीष पाटील, मनोहर पाटील, डॉ.सरोज पाटील, शांतीलाल पाटील, अॅड.संतोष पाटील, जयवंत पाटील, बापू राजपूत, संजय पाटील, शिवाजी बोरसे, प्रकाश जमादार, मयूर राजपूत, आशीष अहिरे, प्रशांत पाटील, गौतम अहिरे आदि उपस्थित होते.