क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तहसील कार्यालयांतर्गत चार आस्थापनांना आयएसओ मानांकन जाहीर करण्यात आले. तहसीलदार आबा महाजन यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागांनी ही कामगिरी बजावली.

शिरपूर पुरवठा विभागाचे कार्यालय, खर्दे येथील शासकीय धान्य गुदामासह होळनांथे येथील प्रकाश जगन्नाथ चौधरी व करवंद येथील सुरेशसिंह दर्यावसिंह राऊळ परवानाधारक असलेल्या दोन स्वस्त धान्य दुकानांना आयएसओ मानांकन जाहीर करण्यात आले. आयएसओ यंत्रणेने दिलेल्या सुमारे 100 निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. स्वच्छता, ग्राहकांना मिळणार्या मूलभूत सेवा, अभिलेखांचे जतन, टापटीपपणा आदिंची पाहणी केल्यानंतर पूर्वी व नंतर झालेल्या बदलांची तुलनात्मक नोंद घेण्यात आली. त्याबाबत पाठवलेल्या प्रस्तावानंतर तालुक्यातील चार आस्थापनांना आयएसओ मानांकन जाहीर करण्यात आले.

तहसीलदार महाजन यांनी उत्तेजन देऊन आयएसओसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केल्यानंतर पुरवठा विभाग सर्वाधिक सक्रिय झाला. तेथील कार्यालयांचे स्वरुप बदलले. डिजिटलायझेशन, संगणकीकरण, इंटरनेटचा वाढता वापर, पेपरलेस यंत्रणा अशा तांत्रिक बदलांसोबत किमान वेळात कामांचा निपटारा करुन ग्राहकांना संतुष्ट करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. कार्यालयासोबतच शासकीय धान्य गुदामाच्या यंत्रणेतही मोठे फेरबदल करण्यात आले. धान्य वाटपाची यंत्रणा अधिक सुटसुटीत करण्यात आली. जीपीएससारख्या यंत्रांचा वापर वाढला. तेथील कर्मचार्यांना गणवेश देऊन वेगळी ओळख निर्माण करण्यात आली. तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनाही आयएसओसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
आबा महाजन, तहसीलदार : आयएसओसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केल्यानंतर सर्व सहकार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपण काम करतो, सेवा देतो ती जागा स्वच्छ, टापटिपीची असेल तर कामाला अधिक हुरुप येतो हे सर्वांनी लक्षात घेतले. हा बदल घडवून आणण्यासाठी सहकार्य करणार्या सर्व अधिकारी, कर्मचार्यांचे आभार !