क्राईम ब्लास्ट ब्यूरो
कंत्राटी नोकरीच्या कराराच्या नूतनीकरणासाठी चक्क व्हाट्सऍप ग्रुपवर दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या प्रभाग समन्वयकावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केली. सोशल मीडियावर खुलेआम लाच मागण्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार 2019 पासून नंदुरबार जिल्हा परिषदे अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे कंत्राटी तत्त्वावर प्रभाग समन्वयक म्हणून नियुक्त आहेत. त्यांची नोकरी करार स्वरूपाची असल्याने दरवर्षी कराराचे नूतनीकरण करावे लागते. संशयित दिनेश दिलीप भामरे हादेखील जिल्हा परिषदेच्या बचत गट विभागात चिंचपाडा व करंजी खुर्द प्रभागाचा प्रभाग समन्वयक आहे. चार ऑगस्ट रोजी त्याने तक्रारदाराकडे कराराचे नूतनीकरण करून देण्यासाठी व सोयीच्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी तक्रारदार यांनी प्रभाग समन्वयकांच्या समन्वयासाठी तयार केलेल्या व्हाट्सऍप ग्रुपवर दिनेश भामरे यांनी मेसेज टाकला. त्यात आपलं मानधन जमा झालेलं आहे, कृपया दहा हजार रुपये प्रत्येकाने ट्रान्सफर करावे, मला उद्या जिल्हा कक्षाला द्यावे लागतील असा मजकूर होता. त्यामुळे तक्रारदाराने नंदुरबार येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने पडताळणीसाठी साक्षीदारांसह पंच पाठवले असता जमजम चाईल्ड केअर हॉस्पिटल येथे संशयित भामरे यांनी 9 हजार 900 ही नको, 10 हजार 100 ही नको, मला दहा हजार रुपये हवे आहेत, ते तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करा अशी मागणी केली लाच मागितल्याबाबत पडताळणी सत्य ठरल्याने संशयित भामरे यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, उपअधीक्षक सतीश भामरे, राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधवी वाघ, समाधान वाघ, हवालदार पाटील, ठाकरे, पोलीस नाईक, मनोज अहिरे, गावित, पाटील, मराठे, महाले यांनी केली.