क्राईम ब्लास्ट ब्यूरो
वर्क ऑर्डर देण्याच्या मोबदल्यात 28 लाख रुपयांची लाच घेतांना आदिवासी विकास विभागाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले. नाशिक शहरात उंटवाडी येथील नयनतारा या निवासस्थानी लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने बागूलच्या मुसक्या आवळल्या. दिनेश बागूल हा शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे नाशिक जिल्ह्यात हरसूल येथे मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहात सेंट्रल किचनचे काम आर.के.इन्फ्राकन्स्ट्रक्शन लि. या फर्मला मंजूर झाले आहे. एकूण दोन कोटी 40 लाखांचे हे काम आहे. मात्र या कामाचा कार्यारंभ आदेश (work order) देण्यास बागूल टाळाटाळ करीत होता. संबंधित फर्मने पाठपुरावा केला. त्यावेळी दोन कोटी 40 लाख रुपयांच्या 12 टक्के रक्कम मला द्याल तरच ऑर्डर देतो असे बागूल याने सांगितले. ही रक्कम 28 लाख 80 हजार रुपये होती. 19 ऑगस्टला बागूल याने लाच मागितली होती.
संबंधितांने त्याबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. 25 ऑगस्टला बागूल याच्या घरी पैसे देण्याचे ठरले. एसीबीने सापळा रचला. उंटवाडी येथील नयनतारा या निवासस्थानी लाच घेतांना 25 ऑगस्टला बागूल याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
शिरपुरात मालमत्ता : 10, 12 आणि 15 टक्क्यांपर्यंत खुलेआम लाच मागण्याबद्दल बागूल कुप्रसिद्ध आहे. त्याच्या बेहिशेबी मालमत्ता महानगरात आहेत. शिरपूर तालुक्यात पारशीपाडा येथे नातलगांच्या नावावर त्याने जमिनी खरेदी केल्या असून तेथे खदानी तयार केल्या आहेत अशी चर्चा आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली मात्र बागूल याच्या बेहिशेबी संपत्तीची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हे प्रकरण इडीसारख्या यंत्रणेकडे सोपवणे आवश्यक आहे. त्यातून अब्जावधी रुपयांची गुंतवणूक समोर येणे शक्य होणार आहे.