क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्याचा राजकीय राजरंग आणि मतदारांचा कौल दर्शवणाऱ्या 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला.
माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीतील मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग यांचेमार्फत 12 ऑगस्टला जाहीर करण्यात आला असून शिरपूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी सदर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आंबे, भोईटी, बोरपाणी बुडकी, चांदसे- चांदसूर्या, चिलारे, दुरबड्या, फत्तेपूरफॉरेस्ट, गधडदेव, गुऱ्हाळपानी, हातेड, हेंदऱ्यापाडा, हिगांव, हिवरखेडा, जळोद – उखळवाडी, जोयदा, खैरखुटी, खामखेडा प्रा आंबे, कोडिद, लाकड्या हनुमान, लौकी, मालकातर, मोहिदा, नांदरडे, न्यू बोराडी, निमझरी, पनाखेड, रोहिणी, सांगवी, सुळे, वकवाड, झेंडेअंजन, पळासनेर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रम
18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. नामनिर्देशनपत्रे 24 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्राची छाननी 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3.00वाजेपर्यंत असेल. मतदान 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते साय 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी19 सप्टेंबर 2022 रोजी नवीन प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय शिरपूर येथे होईल अशी माहिती तहसीलदार आबा महाजन व निवासी नायब तहसिलदार अधिकार पेंढारकर यांनी दिली.