क्राईम ब्लास्ट ब्यूरो
आई-वडिलांचा छळ करणाऱ्या मुलांच्या कथा आपण नेहमीच ऐकतो पण भावाचा अतोनात छळ करून त्याला भाऊ भावजयीने आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची उदाहरणे मात्र दुर्मिळात दुर्मिळ आहेत. अशीच एक घटना नुकतीच घडली असून भाऊ भावजयसह तिघाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगेश टेडग्या वसावे (वय 28) असे मृताचे नाव आहे. त्याने तीन ऑगस्टच्या रात्री शेतातील महूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याची पत्नी शिलाबाई वसावे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर आत्महत्यामागील कारणाचा उलगडा झाला. ते ऐकून सर्वांना धक्काच बसला.
मृत मंगेश वसावे याला घरातून विभक्त रेशन कार्ड तयार करावयाचे होते. त्यामुळे भाऊ व भावजयीचे नाव कमी करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे आधार कार्ड मागितले. त्याचा राग आल्याने भाऊ सोना टेडग्या वसावे, भावजय कालूबाई सोना वसावे यांच्यासह विनेश पारशी वसावा यांनी मंगेशला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊन त्रस्त केले होते. या छळाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे शिलाबाई वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. संशयित सोन्या वसावे, कालूबाई वसावे (दोघे रा.ठाणा पोस्ट मोरंबा ता.अक्कलकुवा) व विनेश वसावा (रा.सिसा पोस्ट मालसामट ता.डेडियापाडा जि.नर्मदा, गुजरात) यांच्याविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक जितेंद्र महाजन तपास करीत आहेत.