क्राइम ब्लास्ट ब्यूरो
लग्नानंतर माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये आणावेत अशा मागणीसाठी पत्नीचा छळ केल्याच्या गुन्ह्यात संशयित सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर अभियंता शिरपूर तालुक्यातील रहिवासी आहे.
नंदुरबार येथील नागसर नगर येथील युवतीचा विवाह शिरपूर तालुक्यातील अजनाड बंगला येथील रहिवासी तथा सॉफ्टवेअर अभियंता बाबुलाल दरबार राठोड याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसानंतर बाबुलाल राठोड याने श्रीमती विमल राठोड यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारिरिक व मानसिक छळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देण्यास सुरवात केली. तसेच फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन 50 लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. त्यामुळे पत्नीने 2019 मध्ये नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार साहेबराव चौरे यांनी गुन्ह्याचा तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी बाबुलाल राठोड व कुटुंबातील इतर सदस्यांविरुध्द दोषारोपपत्र नंदुरबारचे मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद चव्हाण यांच्या न्यायालयात सादर केले होते. त्यांनी संशयित बाबूलाल राठोड याला एक वर्ष साधा कारावास व 05 हजार रुपये दंड तसेच 5 हजार रुपये न भरल्यास 03 महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार साहेबराव चौधरी यांनी केला. न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍ़ड. श्री. सुनिल पाडवी यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हवालदार पंकज बिरारे यांनी कामकाज केले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच विशेष सरकारी वकील यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी अभिनंदन केले.