क्राईम ब्लास्ट ब्यूरो
माहेरी जाते असे पत्नीने सांगताच संतापाचा स्फोट झालेल्या पतीने तिच्या गळ्याला दोराने गळफास लावून जीव घेतला. दुर्देव म्हणजे जीव जातेवेळी तिच्या पोटात आठ महिन्याचा गर्भ होता. नराधम पतीला पोलिसांनी अटक केली.
वंदना तांबे (वय 30) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती अनिल गुलाब तांबे तिला वारंवार मारहाण करत असे. दोघांमधील भांडणाला शेजारीही कंटाळले होते. 30 जुलैला रात्री तिने पतीला मी माहेरी निघून जात असल्याचे सांगितले. त्यावरुन अनिल तांबे प्रचंड चिडला. त्याने रात्री झोपतांनाच तिला कायमचे नाहीसे करण्याचा निश्चय केला. पहाटे सहाला उठून त्याने सुती दोर तिच्या गळ्याभोवती गुंडाळला व पूर्ण ताकदीने तिचा गळा आवळला. काही सेकंद हातपाय झटकल्यानंतर तिने प्राण सोडला. दुर्देव म्हणजे तिच्या पोटात आठ महिन्यांचा गर्भ वाढत होता. तिच्यासोबत गर्भातील बाळाचाही मृत्यू झाला.
तांबे दांपत्य मूळचे रोहना ता.नांदगाव खंडेश्वर जि.अमरावती येथील रहिवासी असून रोजगारासाठी श्रावणी ता.नवापूर जि.नंदुरबार येथे राहत होते. त्यांचा घरमालक ब्रिजलाल कोकणी याने दिलेल्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित अनिल तांबेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला अटक करण्यात आली. सहायक निरीक्षक नितिन पाटील तपास करीत आहेत.