क्राईम ब्लास्ट ब्युरो
मुलगा व सुनेतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध बापावर प्राणघातक वार करून मुलाने त्याचा खून केला.
ही घटना शिरपूर तालुक्यातील उमर्दा परिसरात कढईपाणी येथे घडली. पेमा हिरा पावरा (वय 73) असे मयताचे नाव असून त्यांचा मोठा मुलगा सुक्राम प्रेमा पावरा याने त्यांचा खून केल्याचा संशय आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुक्राम पावरा व त्याची पत्नी बायटीबाई यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्यावेळी पेमा पावरा व त्यांची पत्नी सुनेची बाजू घेऊन मुलाला दटावत असत. त्यामुळे त्याचा आई-वडिलांवर राग होता. त्याने यापूर्वी त्यांना घरातून बाहेर काढले होते.
16 जूनला सायंकाळी सुक्राम पावराने पत्नीसोबत भांडण उकरून काढले. भांडण सोडवण्यासाठी पेमा पावरा गेले. त्यांनी मध्यस्थी करू नये म्हणून सुक्राम त्यांचे दोन्ही हात धरून झोपडीबाहेर घेऊन आला. त्याचा राग आल्याने पेमा पावरा यांनी त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे संतापून घरातून तीक्ष्ण हत्यार घेऊन आलेल्या सुक्रामने वडिलांच्या पाठीवर सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले. त्यानंतर सुक्राम डोंगराच्या दिशेने पळून गेला. जखमी पेमा पावरा यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यांचा मुलगा विक्रम पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुक्राम पेमा पावरा याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.