क्राईम ब्लास्ट ब्यूरो
पावसापासून बचावासाठी लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील मांडळ गावाच्या शिवारात घडली.
हिरालाल पितांबर पाटील (वय 35, मांडळ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सायंकाळी अचानक वादळ व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरु झाल्याने ते बैलगाडी घेऊन घराकडे परत जात होते. पावसाचा जोर वाढल्याने त्यांनी लिंबाच्या झाडाचा आश्रय घेतला. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, आई, वडील असे कुटुंब आहे. तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.