क्राइम ब्लास्ट ब्यूरो
प्रेमसंबंधातून बहीण पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशय डोक्यात भिनलेल्या सख्ख्या भावाने तिला गळफास लावून ठार केले. तिने आत्महत्या केल्याचा बनाव करून पहाटे घाईघाईने अंत्यसंस्कार केले. पण त्याचे पाप लपून राहिले नाही.
साक्री तालुक्यातील हट्टी येथे घडलेली ही घटना 15 जूनला उघडकीस आली. संशयित भाऊ संदीप रमेश हालोर (वय 24) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली.
पुष्पा हालोर (वय 22) असे मृत युवतीचे नाव आहे. तिचे नवलाने गावातील युवकासोबत प्रेमसंबंध असून ती घरातून पळून जाणार असल्याचा संशय संदीपला होता. आपल्या घराची नाचक्की होईल या भीतीने घटनेच्या रात्री त्याने बहिणीला मारहाण केली. ती ऐकत नसल्याने त्याच्या संतापाचा पारा चढला. हट्टी गाव शिवारातील शिवमेंढा येथे 13/जूनला रात्री तीन वाजता पुष्पाच्या अंगावरील साडीची लेस फाडून निंबाच्या झाडाला बांधून तिला गळफास दिला. तडफडत तिचा जीव जाईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला. ती मरण पावल्याची खात्री करून घरी पोहचल्यावर त्याने बहिणीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती कुटुंबाला दिली. पहाटे पाचला तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून तिला गळफास लावण्यासाठी वापरलेली लेस, साडी आदी पुरावे तिच्या चितेत टाकून दिले.
आपला बनाव यशस्वी झाला अशा खुशीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील यांना पुष्पाचा मृत्यू घातपाती असल्याची माहिती मिळाली. त्यांनी संदीपला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो ढेपाळला व बहिणीचा खून केल्याची कबुली त्याने दिली. तपासकामी उपनिरीक्षक दीपक वारे, हवालदार कांतिलाल अहिरे, पोलिस नाईक संदीप ठाकरे, पोलिस शिपाई नरेंद्र माळी, अवधूत होंडे यांचे सहकार्य लाभले.