शिरपूर: भटाणे ते तऱ्हाड कसबे या मार्गावरील रखडलेल्या रस्ते कामाचा फटका वाहनचालकांना सातत्याने बसत असून, मंगळवारी (9 जून) सकाळी झालेल्या एका अपघाताने पुन्हा एकदा या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित झाली आहे. खड्डे आणि रस्त्यावर विखुरलेली खडी चुकवण्याच्या प्रयत्नात ग्रामसेवकांच्या कारचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली.
माहितीनुसार, तऱ्हाड कसबे येथील ग्रामसेवक लिंबा बोरसे हे एमएच-22 एन-2337 क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायर कारने ग्रामपंचायत कार्यालयाकडे जात होते. भटाणे गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पोहोचताच रस्त्यातील खड्डे आणि सैल खडीमुळे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याबाहेर जाऊन अपघातग्रस्त झाली.
या अपघातात लिंबा बोरसे यांना किरकोळ दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भटाणे ते तऱ्हाड कसबे या सुमारे सहा किलोमीटरच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. अनेक ठिकाणी खोदकाम करून रस्ता अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्डे, चिखल आणि सैल खडीमुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
संबंधित विभागाने रखडलेले रस्ते काम तातडीने पूर्ण करावे, धोकादायक खड्डे बुजवावेत आणि रस्त्यावर पडलेली खडी हटवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणखी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
