शिरपूर : तालुक्यातील जैतपूर येथे सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवत कारवाई तात्पुरती स्थगित करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या गावठाण जागांसह इतर सार्वजनिक जागांवर अनेक अतिक्रमणे अस्तित्वात असताना केवळ एका कुटुंबावर कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे.
यासंदर्भात प्रांताधिकारी तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात श्रीमती मोनिका संतोष कुवर व त्यांचे वडील शिवनाथ दामू गायकवाड यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गावातील इतर अतिक्रमणांची नोंद, त्यांच्यावरील कारवाईचा तपशील आणि अतिक्रमण हटविताना कोणते निकष व प्रक्रिया अवलंबली जाते, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सर्वांवर समान निकषांनुसार कारवाई होत आहे का, याबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित कुटुंबाला आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली आहे का, याची खात्री करण्याची मागणीही करण्यात आली. या कारवाईमुळे संबंधित महिला व त्यांच्या कुटुंबावर मानसिक ताण निर्माण झाल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला असून अंतिम निर्णय होईपर्यंत कारवाई स्थगित ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, प्रकरणात कोणत्याही अधिकाऱ्यांकडून चुकीची अथवा अपूर्ण माहिती सादर झाल्याचे आढळल्यास स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. भारतीय संविधानातील समानता, नैसर्गिक न्याय व निष्पक्ष प्रशासनाच्या तत्त्वांनुसार या प्रकरणाचा पुनर्विचार करून संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे
यावेळी नगरसेवक गणेश सावळे,पिंटू शिरसाठ,बापू थोरात यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
