शिरपूर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिरपूर तालुक्यातील आढे येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल दक्षा गिरासे-राजपूत यांना राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत दिला जाणारा ग्रामपंचायतस्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नवीन आढे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गटशिक्षण अधिकारी तथा प्रशासक डॉ. नीता सोनवणे, ग्रामविकास अधिकारी तथा सहायक प्रशासक राजश्री पाटील, सामाजिक अंकेक्षण तालुका समन्वयक स्वप्नील निकम तसेच पुरस्कार निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, श्रीफळ, धनादेश व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
दक्षा गिरासे-राजपूत यांनी ग्रंथालय चळवळ, वाचन संस्कृती संवर्धन तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीही धुळे जिल्हा ग्रंथालय संघाच्या ४७ व्या वार्षिक अधिवेशनात ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट ग्रंथालय महिला सेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
याच कार्यक्रमात अंगणवाडी सेविका सुरेखा शिरसाठ यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमास माजी उपसरपंच योगेश पाटील, आशासेविका भारती पाटील, रोजगार सेविका सुजाता शिरसाठ तसेच विविध समित्यांतील महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर जगदेव व मच्छिंद्र कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
दक्षा गिरासे-राजपूत यांना मिळालेल्या या सन्मानामुळे आढे गावासह शिरपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
