
शिरपूर (प्रतिनिधी) : शिरपूर तालुका कोळी समाज कर्मचारी संघटना व शिरपूर तालुका कोळी समाजाच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या गुणवंत तरुणांचा सत्कार समारंभ आमोदा येथील लाकड्या हनुमान मंदिर परिसरात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे समाजातील युवकांना प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिरपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते लाकड्या हनुमानाची महाआरती करून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेले विजय कोळी (होळनांथे), मनोहर कोळी (असली) आणि विशाल बागुल (गिधाडे) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना चिंतनभाई पटेल यांनी तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन शासकीय सेवेत स्थान मिळवावे व आपल्या कुटुंबासह गाव, समाज आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. तसेच समाजातील युवकांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असा संदेश दिला.
कार्यक्रमात किशोर बागुल यांनी मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल तसेच आमदार काशीराम पावरा यांनी गरजू व मेहनती युवकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुविधेचा लाभ तरुणांनी घ्यावा, असे सांगितले.

यावेळी लोटन कोळी सर यांनी निवड झालेल्या युवकांना मार्गदर्शन करताना देशसेवा, प्रामाणिकपणा, समाजाप्रती आदर आणि आई-वडिलांची सेवा हेच खरे कर्तव्य असल्याचे सांगितले.समारंभास जनकभाई पटेल, निवृत्त पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर, रोहित रंधे, धुळे-नंदुरबार जिल्हा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बागुल, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कुवर, सचिव दिनेश श्रीराव, दिलीप शिरसाठ, रमेश देवरे, किशोर शिरसाठ, छोटुराम वाघ यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी, कर्मचारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, स्व. तपनभाई पटेल युवा मंच आणि चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने लाकड्या हनुमान मंदिर, आमोदा येथे भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले
