शिरपूर : शिरपूर तालुक्यात जलसंधारणाच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’च्या कामांचा सकारात्मक परिणाम सर्वत्र स्पष्टपणे दिसून येत असून, माजी शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे तालुक्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील करवंद गावातील शेतकरी दिनेश सुरेश कोळी यांच्या लौकी शिवारातील शेतावर नुकतेच ट्युबवेल खोदकाम सुरू असताना केवळ ५० ते ६० फुटांवरच पाणी लागल्याची घटना घडली.सामान्यतः या भागात पाणी मिळवण्यासाठी अधिक खोलीपर्यंत खोदकाम करावे लागते, त्यामुळे एवढ्या कमी खोलीवर पाणी मिळाल्याने शेतकरी कोळी यांना प्रचंड आनंद झाला. ही बाब गावातील इतर शेतकऱ्यांसाठीही आश्चर्यकारक ठरली.
ही माहिती मिळताच करवंद गावातील प्रगतीशील शेतकरी तसेच धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी गावातील इतर शेतकऱ्यांसह संबंधित शेतावर भेट देऊन पाहणी केली. प्रत्यक्ष ट्युबवेलमध्ये कमी खोलीवर लागलेले पाणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि या यशामागे ‘शिरपूर पॅटर्न’ची मोठी भूमिका असल्याचे नमूद केले.
यावेळी बोलताना देवेंद्र पाटील व शेतकरी दिनेश कोळी यांनी सांगितले की, दोन ते तीन वर्षांपूर्वी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या पुढाकारातून अरुणावती नदीवरील करवंद येथील बंधाऱ्यातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला होता. या उपक्रमामुळे नदीपात्रातील पाण्याची साठवण क्षमता वाढली आणि पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी झाली. परिणामी, करवंद व लौकी शिवारातील भूगर्भातील जलसाठा वाढला असून त्याचे प्रत्यक्ष परिणाम आता दिसून येत आहेत.
‘शिरपूर पॅटर्न’ हा जलसंधारणाचा एक यशस्वी आणि परिणामकारक मॉडेल ठरत असून, या पद्धतीमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यावर भर दिला जातो. बंधाऱ्यांतील गाळ काढणे, नदीपात्र खोल करणे आणि पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवणे यामुळे जलसाठा वाढतो व भूजल पुनर्भरणाला चालना मिळते. याच धोरणामुळे आज शेतकऱ्यांना कमी खोलीवर पाणी उपलब्ध होत आहे.या घडामोडींमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती उत्पादन वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. भविष्यात सिंचनाच्या अडचणी कमी होऊन शेती अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमरिशभाई पटेल यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कार्याला “जलक्रांतीचे शिल्पकार” म्हणून ओळख मिळत आहे.
