नंदुरबार : जिल्ह्यात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर होणारे बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने कडक पावले उचलली आहेत. बालविवाह ही प्रथा
बालहक्कांच्या विरोधात असून ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006’नुसार असे विवाह बेकायदा आहेत. अशा विवाहांमध्ये सहभागी होणाऱ्या तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी दिला आहे.
बालविवाह रोखण्याच्या दृष्टीने केवळ पालकांवरच नव्हे, तर विवाह प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या विविध घटकांनाही जबाबदार धरण्यात येणार आहे. विवाह विधी पार पाडणारे धार्मिक गुरु व पंडित, तसेच मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यावसायिक, लॉन्स मालक आणि वाजंत्री यांच्यावरही कारवाई होऊ शकते. याशिवाय, गावात बालविवाह घडल्यास सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांनाही जबाबदार धरले जाणार आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, लग्न समारंभाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनी कामाची ऑर्डर स्वीकारण्यापूर्वी नवरा-नवरीच्या वयाचे अधिकृत पुरावे तपासणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर बालविवाह प्रतिबंधाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बालविवाह थांबविण्यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनीही अशा प्रकारांना विरोध करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.