शिरपूर –तालुक्यातील तऱ्हाडी येथील माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी (दि. ८ एप्रिल) उत्साहात पार पडले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी आणि जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. वंदना रायबोले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सामाजिक समतेचे महत्त्व अधोरेखित करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.
दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये संविधान जनजागृती अभियान, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे, लोकप्रतिनिधींशी संवाद मेळावे, संविधानाचे वाटप, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, संचालिका उज्वला भामरे, संचालक प्रशांत भामरे, मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांच्यासह शिक्षक व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताहादरम्यान विविध उपक्रमांद्वारे सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.