शिरपूर : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत मानले जाणारे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेने शिरपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या निषेधार्थ आदिवासी कोळी समाजाच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांना निवेदन देत कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शने करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, राघोजी भांगरे हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही समाजाच्या स्वाभिमानावर झालेली गंभीर आघात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, याआधीही सप्टेंबर २०२५ मध्ये अशाच प्रकारची घटना घडल्याची आठवण करून देत प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
तसेच, स्मारक परिसरातील सोलर दिव्यांची चोरी झाल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याचे अधोरेखित करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दोषींना तात्काळ अटक, मुख्य सूत्रधारांचा शोध, पुतळ्याची त्वरित दुरुस्ती, कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या ठोस मागण्या केल्या.प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात नगरसेवक चंद्रकांत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विनायक कोळी, मोहन कोळी, राहुल ईशी, भिका चव्हाण, अजिंक्य शिरसाठ, समाधान कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते