शिरपूर : शहरातील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय रोजगारक्षमता व प्राविण्य वृद्धी अंतर्गत ई-व्हेईकल कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित या कार्यशाळेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील ५० प्रशिक्षणार्थींनी सक्रिय सहभाग नोंदवला.प्राचार्य डॉ. हितेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन ते भविष्यातील संधींसाठी अधिक सक्षम होतील, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना आधुनिक ई-व्हेईकल तंत्रज्ञानाची सखोल माहिती देण्यात आली. यामध्ये ई-व्हेईकलची रचना, बॅटरी व्यवस्थापन प्रणाली, मोटर कंट्रोल, चार्जिंग तंत्रज्ञान तसेच वाहनांची देखभाल व दुरुस्ती याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय, ई-व्हेईकल क्षेत्रातील करिअर संधी, उद्योगाभिमुख कौशल्ये व उद्योजकतेच्या संधींबाबतही माहिती देण्यात आली.कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणांवर काम करण्याची संधी मिळाली. संवादात्मक सत्रे, शंका निरसन व लघु प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला.या प्रसंगी कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा. निलेश पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर हर्षल बडगुजर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र विभाग प्रमुख प्रा. प्रशांत टोकशा, इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रा. साजिद शेख यांनी विशेष प्रयत्न केले.प्राचार्य डॉ. हितेंद्र महाज, उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. आर. डी. जाधव, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.