धुळे : जागतिक क्रिकेटमध्ये वेगाने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंनी मानसिक व शारीरिकदृष्ट्या अधिक सक्षम होणे अत्यावश्यक आहे, असे मत महाराष्ट्राचे माजी रणजीपटू व जलद गोलंदाज शेखर घोष यांनी व्यक्त केले. धुळे येथे आयोजित आनंद डेव्हलपर्स टी-20 जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले की, आधुनिक क्रिकेट अत्यंत वेगवान झाले असून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खेळाडूंनी कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे. केवळ जिम ट्रेनिंगवर अवलंबून न राहता नियमित धावण्याचा सराव करणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या अनेक खेळाडू पुरेसा सराव न केल्याने जखमी होत असून त्यांची कारकीर्द अल्पकालीन ठरत आहे. धावण्यामुळे खेळाडूंची मानसिक व शारीरिक क्षमता नैसर्गिकरित्या वाढते, असा सल्लाही त्यांनी दिला.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ही स्पर्धा येथील एस.व्ही.के.एम. कॅम्पसच्या भव्य मैदानावर पार पडली. उद्घाटन शेखर घोष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, उपप्राचार्य पिंकी साहा, प्रायोजक हेमंत पाटील, स्पर्धा समितीचे चेअरमन प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत जिल्हाभरातील २१ संघांनी सहभाग नोंदविला असून प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे ठेवण्यात आले आहे. उद्घाटनीय सामना एसपीसीसी क्रिकेट क्लब, धुळे आणि लगान क्रिकेट क्लब, धुळे यांच्यात खेळविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश मराठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी मानले. स्पर्धेसाठी एसव्हीकेएमचे क्रीडा संचालक किरण अंचन यांचे सहकार्य लाभत असून, सहभागी सर्व संघांना असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल व राजवर्धन कदमबांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.