शिरपूर तालुक्यावर 2 एप्रिल 2026 च्या सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः कहर केला. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे अनेक गावांतील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 30 गावांमधील तब्बल 392 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सुमारे 480 शेतकरी या संकटाच्या विळख्यात सापडले आहेत.

बाजरी, मका, केळी, पपई, रब्बी ज्वारी, गहू तसेच भाजीपाला पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुहेरी संकट उभे राहिले आहे.याच दरम्यान, अहिल्यापूर येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने तात्काळ हालचाली करत तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.