शिरपूर : शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने केलेल्या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) या गुंगीकारक अंमली पदार्थासह एका संशयिताला अटक करण्यात आली असून सुमारे १० लाख १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी रात्री उशिरा शहादा फाटा परिसरात करण्यात आली.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जयपाल प्रकाशसिंग गिरासे (वय ३८, रा. पळासनेर, ता. शिरपूर) हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई ‘व्हेन्यू’ (क्र. MH 14 KF 8682) कारमधून एमडी ड्रग्जची वाहतूक करून विक्रीसाठी येणार आहे. या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंच, राजपत्रित अधिकारी व इतर आवश्यक यंत्रणेसह शहादा फाट्यावर सापळा रचला. दरम्यान, संशयिताची कार येताच थांबवण्याचा इशारा देण्यात आला असता चालकाने वाहनासह पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून जय भद्रा टी-पॉईंटजवळ वाहन अडवले.
तपासणीदरम्यान संशयिताच्या अंगझडतीत पांढऱ्या रंगाचा, उग्र वास असलेला २०.८४ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रोन) सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. या पदार्थाची किंमत सुमारे ४ लाख १६ हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच ६ लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमाल १० लाख १६ हजार ८०० रुपये इतका आहे.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८(क), २२(ब) व २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली असून त्याने हा माल कुणाकडून आणला याचा तपास सुरू आहे.
सदरची कारवाई सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अजय देवरे तसेच शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पीएसआय संदिप दरवडे,सुरेश सोनवणे तसेच डी.बी.पथकाचे पोहेकाँ रविंद्र आखडमल,अतुल पाटील,सचिन माळी, पोकॉ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंखे, मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी,प्रशांत बाविस्कर, उमेश पवार, गोपाल माळी, शांतीलाल पावरा, सतिष भामरे, सोमा ठाकरे तसेच चापोकॉ रविंद्र महाले, जगन्नाथ माळी व होमगार्ड मिथुन पवार व राम भिल आदींनी केली आहे.