मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाण्याजवळ बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव डंपरने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मृतांमध्ये वाघाडी येथील दोन युवकांसह वर्षी येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश ज्ञानेश्वर माळी २० व सुमित देविदास माळी वय १६, दोघे रा. वाघाडी ता.शिरपूर हे दोघे दुचाकीने शिरपूरहून धुळ्याकडे जात होते. त्याचवेळी सुधाकर श्रावण बडगुजर वय ५८, रा. वर्षी हेही दुसऱ्या दुचाकीवरून त्याच दिशेने निघाले होते. सकाळी सुमारे साडे १० वाजता नरडाणा जवळ आकांक्षा हॉटेल परिसरात मागून येणाऱ्या मातीच्या डंपरने दोन्ही दुचाकींना जबर धडक दिली.या भीषण धडकेत तिन्ही जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे एपीआय निलेश मोरे, पीएसआय महाले, हेकॉ नारायण गवळी, हवालदार सचिन बागुल, भरत चव्हाण, पगारे, श्री. भगरे, भुरा पाटील, चंद्रकांत साळुंके, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.