शिरपूर :मुंबई-आग्रा महामार्गावर चोपडा फाट्यानजिक असलेल्या हॉटेल निलासमोर बसने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर उलटून अपघात झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रॅक्टरमधील गहू रस्त्यावर सांडल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथील एक शेतकरी ट्रॅक्टरमध्ये गहू भरून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दहिवदकडे निघाला होता. तो मुंबई-आग्रा महामार्गावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अमळनेर-इंदौर बसने पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की ट्रॅक्टर रस्त्यावर उलटले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करण्यात आले व रस्त्यावर सांडलेला गहू हटविण्याचे काम करण्यात आले. या घटनेत जीवितहानी टळली असली तरी शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, महामार्गावरील वाढता वेग आणि निष्काळजी वाहनचालना यामुळे अशा अपघातांची मालिका सुरू असून यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.