शिरपूर : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त तालुक्यातील बोराडी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष बीज रोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गाव हरित व सुंदर करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
बोराडी ग्रामपंचायतीला नुकताच महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या यशाबद्दल शासनातर्फे ट्रॉफी, मानचिन्हासह विविध वृक्षांच्या बिया पुरस्कारस्वरूप देण्यात आल्या. पुरस्कारानंतर गावाने पर्यावरण चळवळ अधिक प्रभावीपणे राबवावी, हा शासनाचा उद्देश असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून गावातील सार्वजनिक ठिकाणी बीज रोपण करण्यात आले. या उपक्रमात सरपंच सुखदेव भील, उपसरपंच राहुल रंधे, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी स्वतः बीज रोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारत संत गाडगेबाबांना मानवंदना दिली.
ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “माझी वसुंधरा अभियानातून मिळालेला सन्मान हा गावाच्या पर्यावरणीय बांधिलकीची पावती आहे. दिलेल्या बियांचे वृक्षात रूपांतर करून पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे.”
या उपक्रमामुळे बोराडी गाव स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक बनण्यास निश्चितच चालना मिळणार असून, संत गाडगेबाबांच्या स्वच्छता व समाजसेवेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.