धुळे : सरकारी नोकरी लावतो,असे आमिष दाखवून बनावट नियुक्ती आदेश व खोटे प्रमाणपत्र देत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा चाळीसगाव रोड पोलीस ठाणे येथे दाखल झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार ३ मे २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अंबिका नगर, चाळीसगाव रोड येथील फिर्यादीच्या घरी तसेच मोबाईलवरून वेळोवेळी संपर्क साधत संशयितांनी संगनमताने सरकारी नोकरीबाबत माहिती व आश्वासने दिली. आरोग्य विभाग, आयकर विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात नियुक्ती झाल्याचे भासवून बनावट व खोटे आदेश पोस्टाने, ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष हातात देण्यात आले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी व त्यांचा भाऊ तसेच ओळखीचे वाळके व जयेश शरद खोंडे यांच्याकडून ऑनलाइन ३९ लाख ७४ हजार ५०० रुपये व रोख २२ लाख रुपये, असे एकूण ६१ लाख ७४ हजार ५०० रुपये स्वीकारून आर्थिक फसवणूक करण्यात आली. या तक्रारीवरून आठ संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय संदीप काळे करीत आहेत.
दरम्यान, दुसरा गुन्हा पश्चिम देवपूर पोलीस ठाणे येथे दाखल झाला आहे. सोनाली किशोर साळुंखे (वय ४०, रा. गोंदूर रोड, देवपूर, संत्संग कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा रोहित किरण खैरनार याला उत्पादन शुल्क खात्यात नोकरी लावतो, असे सांगून जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत १७ लाख रुपये रोख घेण्यात आले. रोहितच्या नावाने बनावट जॉइनिंग ऑर्डर तयार करून ती खरी असल्याचे भासवण्यात आले; मात्र नोकरी न देता घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. या प्रकरणी रोशन राजाराम सैंदाणे (रा. चित्रा टॉकीजजवळ, सटाणा, जि. नाशिक), तिलकचंद अंबर पाटील, हेमराज तिलकचंद पाटील, प्रतिभा तिलकचंद पाटील (तिघे रा. रहिमपूर, ता. शिंदखेडा) व किरण (पूर्ण नाव-पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय किरण कोठुळे करीत आहेत.
सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.