साक्री (प्रतिनिधी) – पिंपळनेर येथे साखरपुड्याच्या मंडपात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या भीषण मारामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
घटनेनंतर संशयितांनी गुजरातच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी सीमाभागात पाठलाग करून त्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार,गोसावी समाजातील साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना लग्न पत्रिकेतील नावावरून या किरकोळ कारणावरून भाऊबंधकीच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत सुरेश गोसावी (५०), साहिल गोसावी (३५) आणि देवेंद्र पवार (३६) यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित ब्रेझा कारमधून गुजरातकडे पळून जात होते. याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत ओटाबरी घाट परिसरात वाहन क्रमांकाच्या आधारे अडथळा निर्माण केला. स्थानिकांच्या मदतीने कार अडवण्यात यश आले.या कारवाईत कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले. तिघेही सोनगड येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.