शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात प्रतिबंधित गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धडक छापा टाकून तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत महादेव दोंदवाडा येथील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून तालुक्यातील महादेव दोंदवाडा गावशिवारात संशयीत राशा समदा पावरा वय ५०, रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या कसत असलेल्या शेतात छापा टाकण्यात आला।सदर शेतात फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे लागवड केल्याचे आढळून आली.
कारवाईदरम्यान अंदाजे ४१ लाख रुपये किमतीचा सुमारे ८२० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि जयपाल हिरे करीत आहेत.घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट देत पाहणी करून मार्गदर्शन करीत सूचना दिल्या.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,पीएसआय सुनिल वसावे, पोहेकॉ संतोष पाटील, जाकीरोद्दीन शेख,जगन्नाथ कोळी, पोहेकॉ राजु ढिसले, विजय ढिवरे,स्वप्नील बांगर,दिनकर पवार,वाला पुरोहित,कृष्णा पावरा व चापोहेकॉ अल्ताफ बेग मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केली आहे.