शिरपूर: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला व्यापार करार भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा असून, केंद्र सरकारने देशातील शेती क्षेत्र जागतिक व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधले आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी यांनी केला आहे. या करारातील शेतीविषयक जाचक अटी तातडीने रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.
शेती हा विषय आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे भारताचे पारंपरिक धोरण भाजप सरकारने पायदळी तुडवले आहे, असे नमूद करत अॅड. परदेशी म्हणाले की, अमेरिकन सरकार तेथील शेतीला प्रचंड अनुदान देते. त्यामुळे अमेरिकेतील मका, सोयाबीन, बदाम व पिस्ता यांसारखी उत्पादने विनाशुल्क किंवा अत्यल्प शुल्कात भारतीय बाजारात दाखल झाल्यास देशातील शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारे भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील.
कराराअंतर्गत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी बाजारपेठ खुली केल्यास ग्रामीण भागातील जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच, अमेरिकेत पिकवला जाणारा मका व सोयाबीन यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनुकीय बदल केलेले असल्याने अशा बियाण्यांचा भारतात शिरकाव झाल्यास पर्यावरण व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्र सरकारने या व्यापार करारातील शेतीविषयक अन्यायकारक अटी तातडीने मागे घ्याव्यात; अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्यभर आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा अॅड. हिरालाल परदेशी यांनी दिला आहे.