शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील जनसंघ व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, शेतकरी, कामगार, मजूर व सर्वसामान्यांचे लोकनेते, माजी आमदार तसेच शिरपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या मंगळवार (दि. ४) रोजी प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सकाळी ठीक १०.३० वाजता शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावरील १८ मीटर रोडवरील श्री महादेव इंटरप्रायझेस येथे होणार आहे. यावेळी स्व. तात्यासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
स्व. तात्यासाहेब पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक जीवनात शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले. जनसंघाच्या काळापासून त्यांनी पक्ष संघटन मजबूत करत शेतकरी, कामगार, मजूर व दुर्बल घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. आमदार तसेच नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राबविलेल्या विविध विकासकामांमुळे शिरपूर शहर व तालुक्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास शिरपूर शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, भाजपाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्व. तात्यासाहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी केले आहे.