शिरपूर (प्रतिनिधी) तापी परिसर विद्या प्रसारक संस्था संचलित स्व. आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर सायन्स कॉलेज, तऱ्हाडी (ता. शिरपूर) येथे सन २०२५–२०२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक बक्षीस वितरण व गुणगौरव समारंभ सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा संगिता देवरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती शिरपूरच्या गट शिक्षणाधिकारी डॉ. निता सोनवणे उपस्थित होत्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे, सचिव विजय भामरे, संचालिका उज्वला भामरे, उषाबाई भामरे, संचालक सुधीर भामरे व प्रशांत भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी सरपंच सुदाम भलकार, माजी उपसरपंच ओंकार पाटील, तुळशीराम भामरे, सुनील धनगर, दीपक पाटील, प्रफुल पाटील, विशाल करंके, किरण अहिरे, कैलास करंके आदी मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ दरम्यान विद्यालयात विविध शैक्षणिक परीक्षा, क्रीडा स्पर्धा तसेच थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. या स्पर्धा व उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांनी केले. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता, शिस्त व सातत्याच्या जोरावर मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य नितीन पाटील यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.