शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्या. लि. शिवाजीनगर, दहिवद ता. शिरपूर जि. धुळे हा माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. (म.प्र.) यांना भाडेतत्वावर देण्यात आला असून येत्या वर्षाच्या हंगामात साखर कारखाना सुरु होणार असून त्या दृष्टीने अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
यापूर्वी दि. 10 मे 2024 रोजी सदरचा कारखाना 20 वर्षे कालावधी साठी भाडेतत्वावर देण्यासाठी मे. माँ-रेवा शुगर्स प्रा. लि. मध्यप्रदेश यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी ताब्यात दिला होता. याबाबत त्यावेळी कायदेशीर नोटरी करून देण्यात आली होती. अधिकृतपणे संपूर्ण रजिस्ट्रेशन (नोंदणी) होण्यासाठी शासन स्तरावर अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन 30 जानेवारी 2026 रोजी अधिकृतरित्या शासन दरबारी रजिस्ट्रेशन होऊन 2026-27 च्या गळीत हंगामात साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू होणार आहे. गेल्या कालावधीत विविध न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे, साखर कारखान्याची जमीन मोजणी साठी मोठा कालावधी लागणे व विविध तांत्रिक अडचणींमुळे बराच वेळ गेला असून आता अधिकृतरित्या संबंधित माँ रेवा कंपनीला 30 जानेवारी 2026 रोजी नियमाप्रमाणे संपूर्ण स्टॅम्प ड्युटी भरून संबंधित कंपनीसोबत करारनामा पूर्ण करण्यात आला आहे.शिरपूर जनक विला येथे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल तसेच माँ रेवा कंपनीचे डायरेक्टर अंकित गोयल, जिल्हा बँक सीईओ मनोज चौधरी, कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल यांच्या वतीने रजिस्ट्रेशनचे कागदपत्रे सुपूर्द करण्यात आले.
तसेच जनक विला येथे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 जानेवारी 2026 रोजी साखर कारखाना संचालक मंडळ बैठक घेण्यात आली. यावेळी साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल, कारखाना संचालक के.डी.पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश चौधरी, डी.पी.माळी, राहुल रंधे, वासुदेव देवरे, संग्रामसिंग राजपूत, भरत पाटील, बन्सीलाल पाटील, धनंजय पाटील, नारायणसिंग चौधरी, जयवंत पाडवी, सौ. मंगला परेश दोरिक, सौ. सुचिता विजय पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.तयानंतर प्रत्यक्ष साखर कारखाना साइटवर जाऊन कारखाना पाहणी करुन पुढील वर्षाच्या हंगामात कारखाना सुरु होण्याबाबत माँ रेवा कंपनचे जनरल मॅनेजर गणेश यादव यांनी संपूर्ण माहिती दिली. माँ रेवा कंपनीचे डायरेक्टर अंकित गोयल यांनी शिरपूरचा हा 8 वा साखर कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतला असून यापूर्वी 7 साखर कारखाने त्यांनी यशस्वीरित्या चालविले आहेत. यापूर्वीच्या कारखान्यातून त्यांनी इथेनॉल निर्मिती व विज निर्मितीवर त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भर देऊन भरपूर इथेनॉल व विज निर्मिती केली आहे.गेल्या काही वर्षापासून शिरपूर तालुक्यातील ऊस याच अनुभवी उद्योजकांकडे दुर्गा खांडसरी व ठिकरी मध्यप्रदेश येथील साखर कारखान्यांमध्ये शेतकरी बांधव नेत होते. त्यामुळे संबंधित माँ रेवा कंपनीचे उद्योजक हे शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे सुपरिचित असून त्यांचा आर्थिक व्यवहार चांगला असल्याचा अनुभव शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी यापूर्वी घेतला आहे.शिरपूर शेतकरी साखर कारखाना हा पुढील वर्षाच्या हंगामात सुरु होणार असल्याने शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.