शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर तालुक्यातील प्रधानदेवी (पो. उमरदा) येथे पतीने केलेल्या बेदम मारहाणीत ३५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अनुबाई पमा पावरा (वय ३५, रा. प्रधानदेवी,पो.उमर्दा,ता.शिरपूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री पमा पावरा याने घरगुती वादातून पत्नी अनुबाई यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सकाळी महिलेचा भाऊ विकास सुरसिंग सेनानी (रा. जोगवाडा, ता. नेवाली, जि. बडवाणी) याने अनुबाई यांना बेशुद्ध अवस्थेत शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र पावरा यांनी तपासणी करून अनुबाई पावरा यांना मयत घोषित केले. घटनेनंतर आरोपी पती पमा पावरा हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पीएसआय मिलिंद पवार करीत आहेत.