नरडाणा (प्रतिनिधी) :शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे SBI व युनियन बँकेच्या एटीएम केंद्रात कार्ड बदलून फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरेश मोरे हे एटीएममधून पैसे काढत असताना दोन अनोळखी व्यक्ती आतमध्ये आल्या. “आम्हाला घाई आहे” असे सांगत त्यांनी शिताफीने मोरे यांचे एटीएम कार्ड मशीनमधून काढून घेतले व तेच कार्ड बदलून परत दिले. त्यानंतर काही क्षणांतच आरोपी तेथून पसार झाले.घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांतच, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.१९ वाजता, मोरे यांच्या खात्यातून रक्कम वर्ग केल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आणखी नागरिकांना गंडा घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सदर फसवणुकीचा प्रकार SBI व युनियन बँकेच्या नरडाणा येथील एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. संबंधित अनोळखी व्यक्ती लाल रेषेने दर्शविलेल्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
नागरिकांनी एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ नरडाणा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आरोपींची ओळख पटल्यास पोलिसांना सहकार्य करण्याची नम्र विनंती करण्यात आली आहे.